Home Breaking News दुर्गम भागात आरोग्याची उडान!…आलदंडी येथे गडचिरोली पोलीस दलाचे भव्य आरोग्य शिबिर

दुर्गम भागात आरोग्याची उडान!…आलदंडी येथे गडचिरोली पोलीस दलाचे भव्य आरोग्य शिबिर

82

दुर्गम भागात आरोग्याची उडान!…
प्रोजेक्ट उडान अंतर्गत आलदंडी येथे गडचिरोली पोलीस दलाचे भव्य आरोग्य शिबिर

जिल्हा प्रतिनिधी विक्रम शाहा गडचिरोली
दिनांक .27 फेब्रुवारी 2026
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोस्टे आलदंडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात पोमकें हेडरी, बुर्गी (ये.) व पोस्टे आलदंडी हद्दीतील सुमारे 284 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
या उपक्रमाद्वारे अतिदुर्गम भागातील नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शालीनीताई मेघे रुग्णालयातील डॉ. गगन गायकवाड व डॉ. मयुर नागोसे (नेत्ररोग तज्ञ), डॉ. श्रिनिवास त्रिवेदी व डॉ. राहुल कुमार (फिजीशियन) यांच्या पथकाने तपासणी केली.
शिबिरादरम्यान ज्येष्ठ नागरिकांची विशेष नेत्र तपासणी करण्यात आली असून 60 नागरिकांना पुढील उपचारासाठी शिफारस करण्यात आली. नागरिकांची ब्लड प्रेशर, डायबेटीस व इतर आजारांबाबत तपासणी करून आरोग्य व पोषण विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने सन 2021 पासून आतापर्यंत 180 आरोग्य मेळाव्यांद्वारे 40,475 नागरिकांची तपासणी केली असून 5 रक्तदान शिबिरांतून 4,361 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. ऑपरेशन रोशनी अंतर्गत 9,971 नागरिकांची नेत्र तपासणी तर 1,412 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.
या शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज, पोलीस उप-अधीक्षक श्री. विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोस्टे आलदंडीचे प्रभारी अधिकारी सपोनि. अमोल भोसले, पोमकें हेडरीचे सपोनि. पदमसिंग दुल्हत, बुर्गीचे पोउपनि. विकास शिरकुळे तसेच पोउपनि. ईश्वर सुरवसे व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वीपणे पार पाडले.
नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व त्यांच्या पथकाने शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.

Don`t copy text!