वेंगनूर–मुलचेरा मार्गावर नियमित बससेवेची मागणी; नागरिकांकडून विभाग नियंत्रकांना निवेदन
विशेष प्रतिनिधी इंडिया दस्तक न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील वेंगनुर व आसपासच्या गावांतील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गडचिरोली विभाग नियंत्रकांकडे निवेदन देत वेंगनूर–मुलचेरा व वेंगनूर –एटापल्ली मार्गावर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या वेंगनूर परिसरातील या मार्गांवर एसटीची कोणतीही नियमित बससेवा उपलब्ध नाही —
चामोर्शी – घोट – रेगडी – वेंगनूर –सुरगाव – एकनसुर –तांबडा – एटापल्ली – ताडगांव – दोडि – जिवनगट्टा – एटापल्ली (ता. एटापल्ली, जि. गडचिरोली)
रेगडी – वेंगनुर – पुलिगुडम – बोलेपल्ली – हेटलकसा – देवदा – गट्टा – मुलचेरा- अहेरी(ता. मुलचेरा, जि. गडचिरोली)
बससेवा नसल्यामुळे या भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य सेवा, शासकीय कामकाज तसेच न्यायालयीन व प्रशासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत असून आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर दवाखान्यात पोहोचणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
नागरिकांनी भारतीय संविधानातील समानतेचा हक्क, मुक्त प्रवासाचा हक्क व जीवनाचा हक्क यांचा उल्लेख करत दुर्गम व मागास भागातील नागरिकांना मूलभूत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही सार्वजनिक सेवा संस्था असून ग्रामीण व दुर्गम भागात परवडणारी आणि सुरक्षित बससेवा उपलब्ध करून देणे हे तिचे कर्तव्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे वेंगनुर–एटापल्ली व वेंगनुर–मुलचेरा या दोन्ही मार्गांवर दररोज किमान एक तरी नियमित बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.







