ग्रामपंचायत मल्लमपोडूर येथे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
लोकसहभागातून निरुपयोगी खोलीचे ज्ञानमंदिरात रूपांतर
तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामपंचायत मल्लमपोडूर येथे सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली.
ग्रामपंचायत अधिकारी श्री. अविनाश गोरे यांनी ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्यांना व गावकऱ्यांना वाचनालयाचे शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक फायदे समजावून सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करून लोकसहभागातून ग्रामपंचायत कार्यालयातील एका निरुपयोगी खोलीची स्वच्छता करण्यात आली व त्या खोलीचे सुंदर, सुसज्ज सार्वजनिक वाचनालयात रूपांतर करण्यात आले.
या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पंचायत समिती भामरागडचे गट विकास अधिकारी श्री. सुरेंद्र गोंगले यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती भामरागडचे विस्तार अधिकारी श्री. गोपाल माकडे, श्रीकांत नैताम, सागर पाडवे, ग्रामपंचायत सरपंच श्री. रोशन वडे, उपसरपंच श्री. संतोष भुरसे, ग्रामपंचायत सदस्य अरुणाताई वेलादी, ग्रामसंघ अध्यक्ष मोनिका वैरागडे, सचिव मंदाताई नरताम, भरती नरताम, टिना गवारे, अंगणवाडी सेविका करुणा धुर्वे, मोबीलायझर जिजाबाई सडमेक, ग्रामपंचायत कर्मचारी साईनाथ धुर्वे, अरुण काळंगा, संगणक चालक रमेश मिचा, मनोज तिमा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गट विकास अधिकारी श्री. सुरेंद्र गोंगले यांनी ग्रामपंचायत मल्लमपोडूरने लोकसहभागातून सार्वजनिक वाचनालय सुरू केल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष कौतुक केले. वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना, युवकांना तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांना निश्चितच लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
उद्घाटनानंतर गट विकास अधिकारी यांनी गावातील आरोग्य उपकेंद्र, शाळा व अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सार्वजनिक वाचनालयामुळे गावात वाचनसंस्कृतीला चालना मिळणार असून, ज्ञानवृद्धी व सामाजिक प्रबोधनासाठी हे वाचनालय उपयुक्त ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.







