Home Breaking News फराडा रेती घाटातील अवैध रेती उत्खननाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार…

फराडा रेती घाटातील अवैध रेती उत्खननाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार…

208

फराडा रेती घाटातील अवैध रेती उत्खननाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
गडचिरोली :
फराडा रेती घाटातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत थेट राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. सदर रेती घाट तात्काळ बंद करून त्याचे शासकीय मूल्यांकन, मोजणी करून संबंधित रेती माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे, मागील एक महिन्यापासून फराडा घाटातून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे. शासकीय कामांसाठी मंजूर असलेला रेती घाट काही विशिष्ट व्यक्ती व रेती माफियांच्या ताब्यात असून, महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर घाटातून ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने दररोज शेकडो ब्रास रेतीची अवैध वाहतूक होत असून, स्थानिक नागरिकांना मात्र रेती मिळू दिली जात नाही. रेती वाहतुकीसाठी कोणतीही रॉयल्टी भरली जात नसून, घाटावर जीपीएसविना ट्रॅक्टर वापरले जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय, अवैध उत्खननातून काढलेली मुरूम व रेती रस्ते बांधकामासाठी वापरली जात असून, यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास त्यांना धमकावण्यात येत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तातडीने तांत्रिक मोजणी करून दोषी रेती माफिया व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच फराडा रेती घाट कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी ठाम मागणी तक्रार अर्जातून मोहुर्ली,रामाळा, फराडा ,मारखंडा,येथील नागरिकांनी केली आहे.
सदर प्रकरणाची चौकशी जिल्हा अधिकारी यांच्या पथका मार्फत करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केली जात आहे

Don`t copy text!