प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी येथे असलेल्या आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामामध्ये मागील वर्षी खरेदी केलेले धान अद्यापही साठवून असल्याने यंदाच्या हंगामातील नवीन धान खरेदी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जुने धान तातडीने उचलून नवीन धान खरेदी त्वरित सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत भाऊ शाहा यांनी आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय गडचिरोली यांच्याकडे केली आहे.
रेगडी येथील महामंडळाच्या गोदामामध्ये मागील वर्षी खरेदी करण्यात आलेले धान मोठ्या प्रमाणात साठवून आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी आलेले नवीन धान खरेदी करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याचा थेट फटका परिसरातील आदिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत असून त्यांना धान विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने धान विकण्याची वेळ येत आहे.
यासंदर्भात बोलताना प्रशांत शाहा यांनी सांगितले की, “शासनाने हमीभावाने धान खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. मात्र गोदामांमध्ये जुने धान पडून असल्याने नवीन खरेदी सुरू होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने त्वरित जुने धान उचलून गोदामे रिकामी करावीत व नवीन धान खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करावी.”
जर लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मागणीमुळे आता आदिवासी विकास महामंडळ प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.







