तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार भामरागड
भामरागड तालुक्यातील मल्लमपोडूर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होत ग्रामविकासाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा मुख्य भर लोकसहभागातून गावांचे सर्वांगीण विकास करणे, ग्रामपंचायतींना बळकट करणे आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर आहे. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत मल्लमपोडूरने गावकऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत आवश्यक असा पांदन रस्ता निर्माण केला.
ग्रामपंचायत अधिकारी अविनाश गोरे यांनी गावसभांमार्फत लोकसहभागाचे महत्व पटवून दिले. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत रस्त्याचे उपयोग, वाहतुकीतील सुलभता, शेतकऱ्यांना होणारा फायदा, या सर्व बाबींबद्दल माहिती देण्यात आली. या आवाहनाला ग्रामीणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वखर्च व श्रमदान करून रस्ता तयार करण्यास हातभार लावला.
कामाच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत गावकऱ्यांनी हाताशी फावडे–कुदळ घेत स्वतःच उपस्थिती दाखवली. रस्त्याचे समतलीकरण, दगड हटविणे, माती भरणे व पृष्ठभाग मजबूत करणे या सर्व कामांमध्ये ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग घेतला.
या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच रोशन वडे, उपसरपंच संतोष भुरसे, ग्रामपंचायत कर्मचारी साईनाथ गव्हारे, अरुण काळंगा, रोजगार सेवक चेतन भांडेकर, संगणक चालक रमेश मिचा, संदीप वडे, रामा वडे, दिलीप सुरजागडे, राजू वडे आदी पदाधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करीत होते. तसेच गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी श्रमदान करून विकासकामात वास्तविक सहभाग नोंदविला.
ग्रामीण भागात विकासाच्या कामांसाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या सहभागातून परिवर्तन घडवून आणण्याचे मल्लमपोडूरचे उदाहरण प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा हेतू गावकऱ्यांच्या सहभागातून सशक्त, स्वावलंबी व सुविधायुक्त ग्रामपंचायत निर्माण करणे हा आहे, आणि मल्लमपोडूरने या ध्येयाची ठोस अंमलबजावणी करत सहभागी विकासाचा उत्कृष्ट नमुना मांडला आहे.







