वरोरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा; निवडणूक रणसंग्रामाची जोरदार सुरूवात…

149

वरोरा शहर प्रतिनिधी : संकेत कायरकर

वरोरा │ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकट येऊ घातलेल्या निवडणुकांनी वरोरा तालुक्यात राजकीय तापमान चांगलेच चढले असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वरोरा दौऱ्यामुळे या वातावरणाला आणखी गती मिळणार आहे. मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात त्यांची व्यापक जाहीर सभा होणार असून, या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षाच्या वरोरा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेची जय्यत तयारी सुरू केली असून, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ही सभा निर्णायक ठरू शकते, असे पक्षवर्तुळात बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात राज्यातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा, शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना आणि आगामी निवडणुकांसाठीची रणनीती यांवर विशेष भर असण्याची शक्यता आहे. त्यांच्या आगमनाने वरोरा शहरात उत्साहाचे वातावरण असून, विशेषतः महिला व युवकांमध्ये “महाराष्ट्राचे लाडके भाऊ” प्रत्यक्ष भेटणार असल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शहरात ठिकठिकाणी स्वागत फलक, बॅनर्स, भगवे झेंडे आणि प्रकाशयोजना करून सभास्थळाचं आकर्षक रूपांतर करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करत वातावरणात निवडणूक रंगत वाढवली आहे.

सभा — महत्त्वाची माहिती

मुख्य वक्ते: उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

स्थळ: कृषी उत्पन्न बाजार समितीचे पटांगण, वरोरा

दिनांक: 25 नोव्हेंबर 2025 (मंगळवार)

वेळ: दुपारी 4.30 वाजता