एटापल्ली शहरातील २.५० कि.मी. मुख्य रस्ता ६ वर्षांपासून अपूर्ण; नगरपंचायतीकडे हस्तांतरणाची मागणी…

215

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार

एटापल्ली │ राज्य महामार्ग क्र. ३६३ वरील एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील २.५० कि.मी.चा मुख्य रस्ता गेल्या ६ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने अखेर नगरपंचायत प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त करत हा रस्ता नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची अधिकृत मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

पॅकेज क्र. NAG–१३७ अंतर्गत मंजूर आमगाव–देवरी–चिंचगड–कोरची–पुराडा–मालेवाडा–येरकुड–गोदलवाही–कसनसुर–एटापल्ली–आलापल्ली या प्रमुख मार्गाचा २.५० कि.मी.चा एटापल्ली शहरातील भाग वर्ष २०१९ पासून प्रलंबित आहे. Change of Scope प्रस्ताव मंत्रालयात अडकून पडल्यामुळे या रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

सदर रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर असून मोठमोठे खड्डे, तुटलेला पृष्ठभाग आणि धोकादायक वाहतूक परिस्थितीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णवाहिका, शासकीय वाहतूक, शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यापारी दळणवळण सर्वाधिक या मार्गावर अवलंबून असल्याने स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

नगरपंचायत एटापल्लीने पुढाकार घेत या २.५० कि.मी. रस्त्याचे काम स्वतःच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शविली असून, हा महामार्गाचा भाग नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची मागणी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली यांच्याकडे करण्यात आली आहे. रस्ता हस्तांतरित झाल्यास नगरपंचायत तातडीने DPR तयार करून निधी उपलब्धतेनुसार काम सुरू करण्यास सक्षम असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष रेखा गजानन मोहूर्ले, बांधकाम सभापती निर्मला कोंडबतुलवार, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, राहुल कुळमेथे, जितेंद्र टिकले व नगरसेविका निर्मला हिचामी यांच्या स्वाक्षरीसह सादर केलेल्या निवेदनात—
“रस्ता कामाच्या दीर्घ प्रलंबनामुळे वाहतुकीची व्यवस्था ढासळली असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्ता नगरपंचायतीकडे तात्काळ हस्तांतरित करावा”—अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

एटापल्ली शहरातील जनतेच्या दैनंदिन हालअपेष्टांना पूर्णविराम देण्यासाठी प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.