“आधी खर्च कोण करत होते?”
तालुका प्रतिनिधी : आदित्य चिप्पावार, एटापल्ली
आलापल्ली / नागेपल्ली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गेली दीड वर्ष अखंड सुरू असलेली शालेय बस सेवा आता अचानक थांबण्याच्या मार्गावर आहे. रामनवमीच्या कार्यक्रमावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर सर यांच्या पुढाकाराने ही बस सेवा सुरू झाली होती. परंतु डिझेल, चालक पगार आणि मेंटेनन्स खर्चावरून कंपनी आणि नगरपंचायत यांच्यात गंभीर मतभेद निर्माण झाल्याने बस सेवा अडचणीत आली आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल : “मग मागील दीड वर्ष खर्च कोण करत होतं?”
१० जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात बसचे उद्घाटन झाले आणि दुसऱ्या दिवसापासून सेवा नियमितपणे सुरूही झाली. सलग १८ महिने विद्यार्थी या बसवर अवलंबून होते.
मात्र आता कंपनीकडून “आम्ही डिझेल देऊ शकत नाही” असे सांगत सेवा थांबविण्याचे संकेत दिले जात आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये तुफान नाराजी असून सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे—
“नगरपंचायत खर्च करू शकत नाही… कंपनीही नकार देते आहे… तर मागील दीड वर्ष डिझेल, पगार आणि देखभाल खर्च नेमका कुणी केला?”
एका पालकाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले—
“करार नसेल तर बस दीड वर्ष कशी चालली? आता विद्यार्थी भविष्यासोबत खेळ का?”
वादाचा तिढा नेमका काय?
नगरपंचायतीची भूमिका :
कंपनीने बस द्यावी.
पण डिझेल, चालक पगार, देखभाल याचा खर्च कंपनीने करावा.
“नगरपंचायत हा खर्च पेलू शकत नाही” असा दावा.
कंपनीचे उत्तर :
बस (वाहन) देऊ, पण डिझेल, चालक आणि सर्व्हिसिंग खर्च आम्ही करणार नाही.करार फक्त वाहन पुरविण्यापुरता मर्यादित.
या परस्परविरोधी भूमिकेमुळे बस सेवा मध्यंतरीच अडकली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दीड वर्षानंतरच वाद का?
सेवा सुरू करताना करार स्पष्ट नसल्यामुळे आता दोन्ही बाजूंनी जवाबदारी टाळल्याचे चित्र दिसत आहे.
यापूर्वी खर्चाची जबाबदारी कोण उचलत होते? हे मोठे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
पुढील काय? विद्यार्थी हितासाठी निर्णयाची गरज
नागेपल्ली–आलापल्ली परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सेवेवर अवलंबून आहे.
नागरिकांचा ठाम मागणी—
“नगरपंचायत आणि कंपनीने तातडीने चर्चेतून मार्ग काढावा; विद्यार्थी अडचणीत येऊ नयेत.”







