प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार
लाहेरी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत अधिकारी संघटना व पंचायत समिती भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात महाश्रमदान उपक्रम राबविण्यात आला. गटविकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामपंचायत लाहेरी परिसरातील सरपंच व सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
महाश्रमदान अंतर्गत लाहेरी येथील डोंगरसरा जवळील नाल्यावर 100 सिमेंट पिशव्यांचा मजबूत वनराई बंधारा बांधण्यात आला, ज्यामुळे पाण्याचे संरक्षण व जलसाठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता करून स्वच्छता अभियानालाही चालना देण्यात आली.
त्यानंतर लाहेरी येथील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता करण्यात येऊन ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याचा लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेण्यात आला.
या उपक्रमात सरपंच राजेश्वरी बोगामी, ग्रामसेविका जयश्री कुलसंगे, उपसरपंच प्रकाश पंगाती, सदस्य गणेश गोटा, रुक्मिणी गोटा, विमल गुम्मा, सपना कुलयामी, पेसा अध्यक्ष रमेश उसेंडी, तसेच नंदू ओक्शा, दासू वड्डे आदींचा सक्रिय सहभाग होता.
समाजहितासाठी राबविण्यात आलेल्या या महाश्रमदान उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.







