प्रतिनिधी रवींद्र सदमवार
अहेरी (ता. अहेरी, जि. गडचिरोली):
अहेरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बालकल्याण रुग्णालयाचे काही दिवसांपूर्वी दिमाखदार उद्घाटन पार पडले. स्थानिक तरुण-तरुणींमध्ये या नव्या रुग्णालयातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी मोठी अपेक्षा होती. मात्र भरती प्रक्रियेच्या पहिल्याच टप्प्यात पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी पदभरतीसाठी कागदपत्रे घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. हजारो सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या अपेक्षेने उपस्थिती लावली. मात्र, उमेदवारांचे म्हणणे आहे की फक्त कागदपत्रे घेण्याचे औपचारिक काम झाले असून, प्रत्यक्ष मुलाखती, निवड निकष वा पुढील प्रक्रिया याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळाले नाही. तर दुसरीकडे काही उमेदवारांनी असा आरोप केला आहे की, “संपूर्ण प्रक्रिया फक्त कागदपत्रे गोळा करण्यापुरतीच मर्यादित ठेवली गेली असून, भरतीबाबत ठोस कार्यवाही दिसत नाही.”
स्थानिक नागरिक आणि बेरोजगार युवकांनी शासनाकडे मागणी केली आहे की — भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवून स्थानिकांना न्याय मिळावा. अन्यथा या भागातील सुशिक्षित तरुणांचा विश्वास शासनाविषयी कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अहेरी तालुक्यातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, अशा प्रकारच्या अपारदर्शक भरतीमुळे युवकांच्या असंतोषात आणखी भर पडत आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.







