Home Breaking News गोंडपिपरी तालुक्यावर अन्यायाची मालिका; खनिज यादीतूनही वगळल्याने संतापाचा उद्रेक…

गोंडपिपरी तालुक्यावर अन्यायाची मालिका; खनिज यादीतूनही वगळल्याने संतापाचा उद्रेक…

276

प्रतिनिधी शरद कुकुडकर

अतिवृष्टी यादीनंतर आता खनिज निधीपासूनही वंचित; आमदार देवराव भोंगळे यांच्या भूमिकेवर काँग्रेस आक्रमक

गोंडपिपरी (ता. गोंडपिपरी) – खनिज संपत्तीने समृद्ध असलेला गोंडपिपरी तालुका सध्या प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अन्यायाला सामोरा जात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या खनिज विकास निधीच्या यादीतून देखील गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले आहे. यापूर्वी अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून देखील गोंडपिपरीचा समावेश न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यात आता खनिज निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने संतापाचा कडेलोट झाला आहे.

तालुक्यात रेती, दगड, मुरुम अशा प्रकारच्या विविध खनिजांचा साठा असूनही गोंडपिपरीला खनिज विकास निधीपासून वंचित ठेवणे ही शासनाची व लोकप्रतिनिधींची गंभीर दुर्लक्षाची बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवरून व्यक्त होत आहे. या निधीच्या आधारे स्थानिक विकासकामे, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळते. मात्र आता हा निधीच मिळणार नसल्याने तालुक्याच्या विकासाचा मार्गच खुंटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यामुळे विद्यमान आमदार देवराव भोंगळे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. तालुक्यावर अन्याय होत असताना आमदार मात्र एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून नागरिकांत यामुळे अधिकच संतापाची लाट पसरली आहे. आमदारांना तालुक्याच्या समस्या आणि जनतेच्या प्रश्नांपेक्षा मनोरंजनाची अधिक चिंता असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आणि जनतेने एकत्र येत आवाज उठवावा, अशी मागणी राजुरा विधानसभेचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथे पत्रकार परिषदेत केली आहे.अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Don`t copy text!