नागपूर विभागातून धावणार नवीन अमृत भारत एक्स्प्रेस- सहा राज्यांना जोडणारी सुपरफास्ट सेवा…

139

ब्युरो चीफ गौरव मोहबे

नागपूर : भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेस ची आणखी एक नवी ट्रेन आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणार आहे. मुजफ्फरपूर-चारलापल्ली-मुजफ्फरपूर ही नवीन सुपरफास्ट एक्स्प्रेस नागपूर आणि बल्लारशाह या दोन प्रमुख स्थानकांवरून मार्गक्रमण करणार असून, प्रवाशांसाठी ही सेवा १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

अमृत भारत एक्स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक सोयीसुविधायुक्त आणि अतिजलद असल्याने प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. १५२९४/१५२९५ क्रमांकाची ही नवी सुपरफास्ट ट्रेन आठवड्यातून दोन दिवस धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गाडीचे वेळापत्रक –

गाडी क्रमांक १५२९४ मुजफ्फरपूर-चारलापल्ली एक्स्प्रेस मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४० वाजता मुजफ्फरपूरहून सुटेल आणि बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजता चारलापल्ली येथे पोहोचेल. या प्रवासात गाडी नागपूरला दुपारी १२.३० वाजता आणि बल्लारशाहला सायंकाळी ५.१० वाजता थांबेल. दोन्ही स्थानकांवर तिला पाच मिनिटांचा थांबा असेल.

तर गाडी क्रमांक १५२९५ चारलापल्ली-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.०५ वाजता चारलापल्लीहून सुटेल, आणि शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचेल. या प्रवासात गाडी बल्लारशाहला सकाळी १०.१५ वाजता आणि नागपूरला दुपारी १.२५ वाजता पोहोचेल. दोन्ही ठिकाणी तिला ५ मिनिटांचा थांबा असेल.

सहा राज्यांना जोडणारी सुपरफास्ट सेवा –

या गाडीला एकूण २२ कोच असून ती बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांना जोडणार आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारत यांमधील रेल्वे संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

दिवाळी आणि छठपूजेनिमित्त प्रवाशांना दिलासा –

दिवाळी आणि छठपूजेनिमित्त नागपूर विभागातून आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशा काळातच ही अमृत भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत होत असून, नागपूर विभागातून सुरू होणाऱ्या या नवीन सुपरफास्ट सेवेमुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि गतिमान होणार आहे.