प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा
वरोरा:आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन वरोरा येथे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ‘निळा मॉर्मन’ (Papilio polymnestor) याचे दुर्मिळ दर्शन झाले आहे. या फुलपाखराचे सुंदर छायाचित्र प्रा. हेमंत परचाके (प्राणीशास्त्र विभाग) यांनी घेतले आहे.
‘निळा मॉर्मन’ हे भारतातील सर्वात मोठ्या व आकर्षक फुलपाखरांपैकी एक असून, त्याच्या काळ्या आणि तेजस्वी निळ्या रंगाच्या पंखांमुळे ते अत्यंत मनमोहक दिसते. ही प्रजाती सामान्यतः सदाहरित अरण्यात किंवा नैसर्गिक प्रदेशात आढळते आणि मानवी वस्तीपासून दूर राहणे पसंत करते. त्यामुळे हे फुलपाखरू महाविद्यालय परिसरात दिसणे ही दुर्मिळ आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण बाब मानली जाते.
या फुलपाखराच्या अळ्या लिंबूवर्गीय वनस्पतींवर (Rutaceae family) वाढतात. महाविद्यालयाचा परिसर वनस्पतीशास्त्र विभागाच्या (Botany Department) पुढाकाराने सुंदरपणे जपलेल्या हरित कॅम्पसमुळे समृद्ध झाला आहे. या हरित वातावरणामुळे येथे फुलपाखरे, पक्षी आणि इतर अनेक सजीव प्रजातींसाठी अनुकूल अधिवास निर्माण झाला आहे.
महाविद्यालय प्रशासनाने या दुर्मिळ निरीक्षणाबद्दल आनंद व्यक्त केला असून, विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम आणि जैवविविधतेचे जतन करण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना आनंद निकेतन महाविद्यालयाच्या हरित कॅम्पस उपक्रमांची यशस्वीता आणि परिसंस्थेच्या समृद्धीचे द्योतक ठरत असून, जैवविविधता नोंदवहीत एक मौल्यवान भर पडली आहे.