🔹 राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या प्रयत्नांना यश.
🔹 वसाहतीसह परिसरातील नागरिकांना होणार लाभ.
सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर:- वेकोली च्या दुर्गापूर वसाहत क्षेत्रातील पुर्णपणे तुटलेले कामगार मनोरंजन केंद्र अद्ययावत करणेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नाला यश आले असून कामगार मनोरंजन केंद्राचे आता अद्ययावत नूतनीकरण होणार आहे.
वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेड चंद्रपूर क्षेत्रातील दुर्गापूर वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्र असलेल्या एकमेव सभागृहात वेकोली वसाहतीतील कामगारांच्या परिवारातील तसेच कॉलनी लगत असलेल्या परिसरातील नागरिकांचे लग्नसोहळयांसह सुखदुःखाचे मोठ्या स्वरुपात कार्यक्रम होत असते. यासंपुर्ण परिसरात ते एकमेव सभागृह असल्याने अनेकांचा प्राधान्य याच सभागृहात कार्यक्रम करण्याकरीता असतो.
मात्र जवळपास २०-२५ वर्षापासून या सभागृहाची डागडुगी वा नव्याने दुरुस्ती झालेली नाही. सभागृहावरील असलेले टिनपत्रे तुटून असल्याने मोठ्या प्रमाणात त्यामधून पाण्याची गळती होत असते तसेच भिंतीला सुध्दा अनेक ठिकाणी तडे गेलेले असून दरवाजे सुध्दा तुटलेल्या अवस्थेत होते यामुळे पुर्णपणे नादुरुस्त असलेल्या व जीर्ण झालेल्या सभागृहात भविष्यात दुर्घटना सुध्दा घडण्याचे नाकारता येत नव्हते व म्हणूनच सदर सभागृहाचे नुतनीकरण करण्या संदर्भात सतत पाठपुरावा करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस साहेब, खासदार श्री प्रफुल पटेल साहेब, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक उईके साहेब, मा. व्यवस्थापकीय संचालक, वेकोली, नागपूर, मा. क्षेत्रीय व्यवस्थापक वेकोली चंद्रपूर क्षेत्र, स्थानिक खासदार व आमदार यांच्याशी सतत पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला.
आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड कंपनी कार्यालयाचे पत्र क्रमांक वेकोली / चक्षे / महाप्र / सिविल / अम्लाधिकारी / डीपी – १३६३ / ६११५ दिनांक २३.०९.२०२५ रोजी सदर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी कंत्राट देण्यात आलेला असून सदर कंत्राटाची किंमत ५९ लाख ८४ हजार ९७० रुपये ६६ पैसे इतकी आहे. लवकरच या सभागृहाचे अद्ययावत नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल.