मैदानावरचा प्रत्येक घामाचा थेंबच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली – आ. किशोर जोरगेवार…

163

मैदानावरचा प्रत्येक घामाचा थेंबच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली – आ. किशोर जोरगेवार

प्रतिनिधी गौरव मोहबे

सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुणवंत खेळाडूंचा सत्कार

चंद्रपूर – क्रीडा ही केवळ खेळाची गोष्ट नाही, तर ती व्यक्तिमत्त्व घडवणारी, शिस्त, मेहनत, संघभावना आणि आत्मविश्वास शिकवणारी जीवनशाळा आहे. आज २०० गुणवंत खेळाडूंचा आपण सत्कार केला, हे खरोखर अभिमानास्पद आहे. तुमच्यातील प्रत्येक जण चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावणारा आहे. खेळाडूंना आवश्यक संधी व संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मैदानावरचा प्रत्येक घामाचा थेंबच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या २०० गुणवंत खेळाडूंचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, खेळाडू इंद्रजित रंधावा, राजेश नायडू, तसेच प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य माधमशेट्टीवार, डॉ. पुष्पांजली कांबळे, विभागप्रमुख किशोर आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रा. कुलदीप गोंड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना, क्रीडाशक्तीमुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडते, असा संदेश दिला. प्रा. कुलदीप गोंड यांनी विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशाची माहिती सादर केली.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, सरकारकडून व समाजाकडून मिळणाऱ्या संधींचा जास्तीत जास्त उपयोग करून खेळाडूंनी पुढे जावे. आपण फक्त पदके जिंकण्यासाठी खेळू नये, तर निरोगी समाज घडवण्यासाठी, युवकांना व्यसनमुक्त आणि शिस्तबद्ध करण्यासाठी खेळाचा वापर करावा. आजच्या पिढीला क्रीडा संकुले, जिम्नॅशियम, मैदानं, प्रशिक्षण शिबिरे उपलब्ध आहेत. मैदानावरील घामाचा प्रत्येक थेंब तुम्हाला यशाच्या जवळ नेतो. मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपण माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून मैदानी खेळांना प्रोत्साहन देत आहोत. दरवर्षी नॅशनल हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहोत. सोबतच कुस्ती, बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धांचेही नियमित आयोजन केले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाला खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.