बियाणीनगर येथील उद्यानाचा लोकसहभागातून होतोय कायापालट

387
बियाणी नगर हाऊसिंग सोसायटी, तुकूम येथे नागरिकांनी नेहमीच सामाजिक व धार्मिक उपक्रम साजरे करत एकत्र येण्याची परंपरा ठेवलेली आहे. १२५ कुटुंबांनी वसाहतीत गुण्यागोविंदाने वास्तव्य केले असून, चंद्रपूर शहरातील एक आदर्श वसाहत म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने आयोजित केलेल्या “सुंदर माझे उद्यान 2.0 2024” या स्पर्धेत बियाणीनगर उद्यान समितीने सहभाग घेतला आहे. महानगर पालिकेने ठरवलेल्या निकषानुसार, स्थानिक नागरिक दररोज सकाळी आणि सायंकाळी श्रमदान करून आपापल्या कामात उत्साहाने सहभागी होत आहेत. आतापर्यंत उद्यानात पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे बगीच्यातील पाण्याचा निचरा यशस्वी झाला, ज्यामुळे नागरिकांनी शोषखड्ड्याचे महत्त्व अनुभवले आणि भविष्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.

उद्यानातील केरकचरा सेंद्रिय खत निर्मितीसाठी कंपोस्ट पिटच्या बांधकामानेही स्थानिकांना आत्मनिर्भरतेकडे नेले आहे. बगिच्यातील भिंतींना आकर्षक बनवण्यासाठी विविध रंगांनी रंगवले गेले आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील टाकाऊ वस्तू उद्यानासाठी भेट दिल्या.पक्ष्यांकरिता चारा व पाणवठा तयार करणे, टाकाऊ सायकलपासून सेल्फी पॉइंट तयार करणे आणि पर्यावरण पूरक संदेश देण्याच्या अनेक नवीन संकल्पना राबविण्यात आल्या आहेत. बगिच्यात विविध झाडांचे रोपण करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना झाडांची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.या वर्षी डॉ. सुरज बियाणी, डॉ. आम्रपाली खोब्रागडे, डॉ. नम्रता मडावी, आणि डॉ. राणे यांच्या मार्गदर्शनात आयुर्वेदिक औषधी वनस्पती बाग तयार करण्यात आली आहे. आरोग्यदायी उपक्रमांतर्गत बियाणीनगर येथील योग नृत्य शिक्षिका दररोज सकाळी निरंतर योग नृत्य घेत आहेत.

सौर उर्जेवर आधारित नेट मीटरिंगसाठी बियाणीनगर हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी गाळेधारकांना विना मिटिंग नाहरकत प्रमाणपत्र देत आहेत, जेणेकरून अधिकाधिक नागरिक सौर पॅनल लावून शासन सूटाचा लाभ घेऊ शकतील. आगामी १६ तारखेला शाळेतील मुलांसाठी पर्यावरण पूरक स्लोगन तयार करणे, स्वच्छता व पर्यावरणाशी संबंधित चित्रकला स्पर्धा, आणि नागरिकांच्या उपस्थितीत वृक्ष दिंडी यासारखे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. बियाणीनगर येथील उत्साह पाहता, चंद्रपूर शहरातील सर्व उद्यानं नागरिकांच्या सहभागातून सुंदर होण्यास सज्ज आहेत. चंद्रपूर महानगर पालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा उद्देश सफल होण्याची आशा व्यक्त केली जात आहे