‘माणूस’ म्हणून स्वीकारले जात नाही, वेदनांना अंत नाही ! तृतीयपंथीयांनी मांडली हृदयदावक कैफियत

554

नागपूर -कायद्यापुढे सर्व समान असले तरी व जात, धर्म, वंश, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश, जन्माचे ठिकाण इत्यादी कोणत्याही आधारावरचा कोणताही भेदाभेद संविधानास अमान्य असला तरी प्रत्यक्ष जीवन जगताना आम्हास माणूस म्हणूनच स्वीकारले जात नाही. आयुष्यात पावलोपावली व क्षणोक्षणी दु:ख, अवहेलना, अपमान, अन्याय-अत्याचार सहन करावे लागते. आमच्या वेदनांना अंतच नाही, अशी हृदयद्रावक कैफियत प्रशिक्षित समाज कार्यकर्त्यांसमोर तृतीयपंथीयांनी मांडली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाने कार्यान्वित केलेल्या सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत नागपूरातील ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या ‘सारथी ट्रस्ट’ला भेट दिली असता यावेळी उपस्थित तृतीयपंथीयांनी आपल्या व्यथा-वेदना मांडल्या.

ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयातर्फे सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत 18 एप्रिल 2023 ला महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जयंती व तृतीयपंथीयांशी हितगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंती निमित्ताने अभिवादन करुन सारथी ट्रस्टला भेट देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी या भेटीची संकल्पना व भूमिका विशद केली. सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी यांनी तृतीयपंथीयांबाबत होत असलेला भेदाभेद उलगडून लिंग, लैंगिकता, लैंगिक शिक्षण या विषयावरील जाणीव जागृतीची आवश्यकता प्रतिपादन केली.

तृतीयपंथीयांना समाजात मानाचे स्थान नाही. समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असूनही आजही उपेक्षित व वंचित आहे. सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक व इतरही अनेक क्षेत्रात हा समुदाय आजही दुर्लक्षित आहे. तेव्हा, तृतीयपंथीयांना ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात बी. एस. डब्ल्यू , एम.एस. डब्ल्यू व समुपदेशन कोर्स अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिल्या जाईल आणि त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी महाविद्यालय सदैव सोबत राहील अशी शाश्वती देण्यात आली.

यावेळी आयक्युएसी समन्वयक डॉ. कल्पना जामगडे, समान संधी कक्षाच्या समन्वयक प्रा. शालिनी तोरे, डॉ. व्यंकटी नागरगोजे, डॉ. विजयकुमार तुपे, प्रा. रचना धडाडे यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.