Home Breaking News एटापल्लीला शहरी दर्जा द्या; वीज व्यवस्थेसाठी महावितरणकडे निवेदन…

एटापल्लीला शहरी दर्जा द्या; वीज व्यवस्थेसाठी महावितरणकडे निवेदन…

31
xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

एटापल्लीला शहरी दर्जा द्या; वीज व्यवस्थेसाठी महावितरणकडे निवेदन
पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे, नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांची मागणी

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली :
तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या एटापल्ली शहराचा महावितरणच्या नोंदीत अद्याप ग्रामीण भागात समावेश असल्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेला नागरी विस्तार तसेच वाढत्या वीज वापरामुळे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असून नागरिकांना वारंवार वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


सध्या एटापल्ली शहरासाठी केवळ एक लाईनमॅन व एक सहाय्यक लाईनमॅन कार्यरत असल्याने संपूर्ण शहराची जबाबदारी अत्यल्प कर्मचाऱ्यांवर येत आहे. शहरात शासकीय कार्यालये, व्यापारी आस्थापना तसेच मोठ्या प्रमाणात वाढणारी नागरी वस्ती लक्षात घेता वीज व्यवस्थापनासाठी अतिरिक्त तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नगर पंचायत एटापल्लीचे पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे तसेच माजी बांधकाम सभापती व नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांनी महावितरणच्या उपअभियंता कार्यालयात निवेदन सादर केले. एटापल्ली उपविभागातील विद्यमान ग्रामीण वर्गीकरण रद्द करून शहराला शहरी वर्गीकरणाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहरी वर्गीकरण झाल्यास आवश्यक तांत्रिक व सहाय्यक कर्मचारी उपलब्ध होतील तसेच वीजपुरवठा अधिक कार्यक्षम, सुरळीत व जलदगतीने होण्यास मदत होईल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.

Don`t copy text!