मानवी जीवनाचं सत्य आणि त्यानं निर्माण केलेल्या संकल्पना- प्रीती वेल्हेकर रामटेके (विस्तार अधिकारी) चंद्रपूर

0
222

माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याला नैसर्गिकरित्या त्याच्या सोबत पांचेंद्रिये आणि तर्क करण्याची बुध्दी प्राप्त होते. त्यासाठी त्याला वेगळे काही कष्ट करावे लागत नाही किंवा विशिष्ट प्रकारचे शिक्षणही घ्यावे लागत नाही. ही पंचेंद्रिए म्हणजे ज्ञानाची साधने आहेत.

माणूस जन्माला आला मग तो कोणत्याही खंडात असो, देशात असो, राज्यात असो, गावात असो, धर्मात असो, किंवा कोणत्याही जातीत असो त्याला नैर्गिकदृष्टया सारखेच पnचेंद्रीये प्राप्त झालेले आहे.

ही पंचेंद्रिए म्हणजेच ज्ञान मिळवण्याची, सत्य जाणून घेण्याची साधने आहेत. या पंचेंद्रिए शिवाय तर्क करणे म्हणजेच एखादी गोष्ट बुध्दीच्या आधारे चाचपून पाहणे आणि खरे किंवा खोटे, सत्य किंवा असत्य आणि न्याय किंवा अन्याय ठरविता येणे होय.

मला असे वाटते की, ज्ञान मिळविण्याचा इतका मोठा खजिनाच जर आपल्या जवळ उपलब्ध आहे तर केवळ एखादी संकल्पना आपल्या ज्ञान मिळविण्याच्या साधनांची दारे पूर्णपणे बंद करून ती कशी काय मानायला लागतो हे फार मोठं कोडं आहे. खरं तर माणसाच्या वैयक्तिक जीवन प्रणालीवर या गोष्टींनी काहीही चांगला किंवा वाईट फरक पडत नसूनही या गोष्टी अजूनही जशाच्या तशा कश्या काय तग धरून आहेत हा ही मोठा प्रश्न आहे.

संकल्पना म्हणजेच सर्वच पंथातील किंवा मानव जातीतील व्रत वैकल्ये, कर्मकांड, प्रथा – परंपरा, शुभ – अशुभ रीतिरिवाज देव – दानव, श्रध्दा – अंधश्रध्दा या सारख्या गोष्टी होय. या संकल्पना मानवी डोक्यात निर्माण झालेल्या आहेत. त्या निसर्गतः समाजात अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे प्राचीन काळात एखादी संकल्पना उपयुक्त असली तरी आत्ता या काळात जशीच्या तशी संकल्पना मानणे किती संयुक्तिक आहे?

प्राचीन काळापासून तर आत्ताचा काळ पहिला तर या संकल्पना काळानुरूप बाद होणे अपेक्षित आहे. परंतु आजच्या काळात मानवाने इतके शिक्षण घेऊनही या संकल्पना बाद न होता उलटपक्षी त्या अधिक दृढ होत असल्याचे पहावयास मिळते. हे असे का घडत आहे? आज शिक्षण घेतलेली तर्क करता येणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी संकल्पनेला घट्ट चिकटून बसण्याचे कारण काय असेल? स्वतःचे जीवन तर संपेल नाही ना किंवा आपल्या जीवनात काहीतरी वाईट तर घडेल नाही ना ही भीती असावी काय? किंवा त्याने तर्क आणि पंचेंद्रिएच्या आधारे ज्ञान प्राप्त होते हे सत्य स्वीकारायचेच नाकारले आहे काय? तर्क करण्याच्या त्याच्या क्षमता मृतावस्थेत गेल्या आहेत काय? किंवा जाऊदे आपल्याला काय करायचे आहे जसे चालत आहे तसेच चालू दे म्हणून स्वीकार केलेल्या आहेत.

मग तर्क करता येणारी जी बुध्दी आपल्याला प्राप्त झाली आहे त्याचे आपण करतो काय? निश्चितच तिचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करत नसून फक्त शिक्षण घेण्याकरिताच करत आहोत काय? सत्य जाणण्यासाठी आपल्या स्वतःच्या तर्क बुध्दीला घासावे लागते. त्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज नाही तर स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे.

या बाबत कोणीही प्रश्न उपस्थित केला तर बरेच जण खूप सोयीचं वाक्य पुढे करून त्यावर पडदा टाकतील, ते म्हणजे – ” आमच्या भावना दुखावल्या.” ” आमची श्रद्धा आहे.” तुम्हाला काय करायचे आहे?

नाही, कोणालाही काही करायचे नाही परंतु मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या क्षमतांकडे, आपल्या ज्ञानाच्या खजिण्याकडे सपशेल दुर्लक्ष करतो आणि बसतो मानत तर्कहीन गोष्टींना…..

पंचेंद्रिए आणि तर्क करणे या शिवाय आणखी एक मार्ग आहे ज्ञान मिळविण्याचा जो थोडा लांब पल्ल्याचा असला तरी निरंतर सुख देणारा आहे आणि तो मार्ग म्हणजे साधना करणे होय. स्वतःला संयमित करण्यासाठी ही साधना फक्त आपल्या स्वतःच्या आत डोकवा, कोणताही दैवी चेहरा डोळ्यासमोर ठेवू नका, कोणताही मंत्रोच्चार मनातल्या मनात करू नका तर फक्त स्वतःचाच शोध घ्या. ही साधना रोज करा, निरंतर करा, बघा काही सापडत काय? आपल्याच आत….. आपलाच शोध घेतल्यावर……

रोज तुम्हाला काही तरी आपल्यातच विलक्षण असल्याचं जाणवेल. कोणाला लवकर तर कोणाला उशिरा जाणवेल परंतु नक्की जाणवेल, हा माझा विश्वास आहे. या मार्गाने ज्ञान मिळविल्यास कधीही तुम्हाला काही मानण्याची गरज उरणार नाही तर फक्त तुम्ही आयुष्यभर जाणतच रहाल…….

प्रीती वेल्हेकर रामटेके (विस्तार अधिकारी) चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here