HomeBreaking Newsविस्तवाशी खेळणाऱ्या जिंदादिल गझलकरांचा परिवर्तनवादी मुशायरा...

विस्तवाशी खेळणाऱ्या जिंदादिल गझलकरांचा परिवर्तनवादी मुशायरा…

यवतमाळ : स्मृतिशेष गझलश्रेष्ठ इलाही जमादार व ललित सोनोने यांना श्रद्धांजली म्हणून स्थानिक यवतमाळ येथे गझल मुशायरा व कवी संमेलन संपन्न झाले. सुप्रसिद्ध गझलकार अनिल कोसे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी झालेल्या या गझलकाव्य मैफिलीचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक विनय मिरासे ‘अशांत’ यांनी केले.

मुशायऱ्याचा आगाज केला तो नव्या दमाचे गझलकार दुशांत शेळके यांनी
डोक्यात राग माझ्या,डोळ्यात आग आहे
डरकाळ फोडणारा,माझ्यात वाघ आहे
सामाजिक विषमतेविरुद्ध पेटून उठलेला हा गझलकार जेवढा उग्र,तडफदार व प्रलयकारी आहे तेवढाच नम्रही आहे.
गझलेत मांडतो मी,देशातली अवस्था
गझलेतला नवोदित,मी नवचिराग आहे या लाघवी शब्दांतून त्याची विनम्रता प्रस्तुत होते.

आपल्या सुमधुर आवाजाने क्रांतीचा सूर प्रभावीपणे छेडणारा तेवढ्याच ताकदीचा गझलकार अतुल ढोणे तनहा हा होय. अतुलच्या गझलेत अन्यायाविरुद्धचा सात्विक संताप जेवढा ठासून भरला आहे तेवढेच मानवतापूर्ण जीवनाचे संविधानिक विश्लेषण त्याने केले आहे.
वादळी वाऱ्याप्रमाणे धुंद आहे
विस्तवाशी खेळण्याचा छंद आहे
अशा शब्दात विद्रोह व्यक्त करणारा हा गझलकार तेवढ्याच संयमाने म्हणतो की,
विश्व सारे तारणारा धम्म माझा,
गौतमाचा मीच धम्मानंद आहे.!
अतुलच्या या ओळींमधून ‘साऱ्या विश्वाला बुद्ध हवा’ या सूचक महावाक्याची आठवण होते.
गझल मैफलीत साऱ्यांनीच आपापल्या परीने आशय अभिव्यक्ती व विद्रोहाचा प्रभावी रंग भरला, पण त्यातही प्रमोद कांबळे ‘संबोधी’ व आनंद देवगडे हे गझलकार अधिक वरचे ठरले.
स्पंदनांचा काळजाशी मेळ नाही
माय आहे ! बाप आहे ! वेळ नाही
या आशयपूर्ण शेरामधून विसंगत समाजव्यवस्थेचे भीषण चित्र आजच्या पिढीसमोर उभं करणाऱ्या आनंद देवगडे यांनी आपल्या
श्वासासमान घेतो मी ‘बुद्ध वंदनेला’,
अन् तेवढीच आहे मजला ‘अजाण’ प्यारी
या शेरातून मैफिलीला कमालीची उंची मिळवून दिली. तर
जुलमी सभोवताली,पसरून पाय आहे
सडुनी घरात आता,मरण्यात काय आहे
त्यांना कशास सांगू,गोमूत्र रोज प्यावे
ज्यांच्या घरी शिक्यावर,टांगून साय आहे
या मर्मभेदी शब्दात प्रमोद कांबळे ‘संबोधी’ यांनी व्यवस्थेची चिरफाड केली. आपल्या आशयघन व भविष्यवेधी शब्दांनी उपस्थित रसिकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या या दोन्ही समर्थ,परिवर्तनवादी गझलकारांचे भवितव्य फार उज्वल आहे,हे निश्चित.
त्याचबरोबर गझलकार महेश अडगुलवार यांनी आपल्या गझलेतून वर्तमान राजकारणावर संधान साधले
बघ केवढे तयांचे पुरते हसे निघाले
जे काल वाघ होते भित्रे ससे निघाले !…
मतदान काल केले चोरास फालतू मी
वचनास पाळले ना नेते कसे निघाले !…
तसेच शहरातील नामवंत कवींनीदेखील या मैफलीत आपल्या दमदार काव्यरचना सादर केल्या.त्यात प्रामुख्याने जेष्ठ कवी दिनकर वानखेडे यांची कविता विशेष भाव खाऊन गेली.
हे रोजरोजच मरण संपलं तर
थोडं जगेन म्हणतो
आजपर्यंत सार तुमचचं ऐकत आलो
आता मीच माझ्याशी बोलेल म्हणतो!
अश्या आत्मनिवेदनपर ओळीतून दिनकर वानखेडेंनी मैफिलीत रंग भरला.त्यांच्यासह महादेव कांबळे,निलध्वज कांबळे व सूत्रसंचालनकर्ते विनय मिरासे अशांत यांनीही दमदार आशयाच्या रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.
नेतृत्व किसानांचे भलतेच डमी झाले
पाहून पीकराशी हमीभाव कमी झाले
काट्यास लाज आली पायात रूततांना
चप्पलींनीही डसावे तो घाव वर्मी आहे
या शब्दात निलध्वज कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तर
शेतात राबणारे हैराण आज आहे
सत्तेत वाढलेले मुज्जोर फार झाले
शोषित माणसांच्या पाठीत वार केले
जातीय दंगलींना हद्दीत बंद केले
या शब्दात महादेव कांबळे यांनी सामाजिक व्यथा मांडल्या.
मैफलीचे अध्यक्ष मा.अनिल कोसे यांनी अप्रतिम आशयाच्या दोन दमदार गझल सादर करून मैफलीचा यशस्वी समारोप केला.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
त्या हासऱ्या मुखाच्या हृदयी चरा असावा
चाखून गोडवा तो,आयुष्य तृप्त झाले
गझलेत अमृताचा,नक्की झरा असावा
अशी गझलेचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणाऱ्या ओळींनी वातावरण भारून टाकले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित असलेले प्रा. माधव सरकुंडे यांनीही आपल्या दोन रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
मैफिलीचे आभार सृजन साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बाळकृष्ण सरकटे यांनी केले.यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खराबे यांनी विशेष प्रयत्न घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!