Home Breaking News दुर्लक्षित म.सा. कन्नमवार इको पार्कच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी द्यावा; वनविभागाने तातडीने...

दुर्लक्षित म.सा. कन्नमवार इको पार्कच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी द्यावा; वनविभागाने तातडीने पुढाकार घ्यावा !…

57

दुर्लक्षित म.सा. कन्नमवार इको पार्कच्या विकासासाठी राज्य सरकारने निधी द्यावा; वनविभागाने तातडीने पुढाकार घ्यावा !
दिना धरण परिसरातील पर्यटनस्थळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट:
चामोर्शी तालुक्यातील दिना धरण जलाशयालगत वसलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ म.सा. कन्नमवार इको पार्क गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असून, या ठिकाणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा तसेच वनविभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सन २०१४-१५ दरम्यान वनविभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून या इको पार्कमध्ये विविध विकासकामे करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यासह परिसरातील शेकडो पर्यटक दररोज येथे भेट देत होते. मात्र, कालांतराने वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पार्कची दुरवस्था झाली असून, येथील विविध शोभेच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत किंवा जीर्ण अवस्थेत पडून आहेत. अनेक ठिकाणी तुटफूट झालेली दिसून येत असून, पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी वॉल कंपाउंड, स्वच्छतागृह, उपहारगृह, विश्रामगृह, अंतर्गत रस्ते, नाली व्यवस्था, बारमाही चौकीदार तसेच विविध सौंदर्यीकरण विकासकामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. या पर्यटनस्थळाचा योग्य विकास झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट निसर्गरम्य स्थळाचा आनंद घेता येईल तसेच पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारनिर्मितीलाही मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार, भूषणा खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, तालुका सचिव दिनेश मुजुमदार, महेश विश्वास, लीना विश्वास, विशाखा सिंह तसेच स्थानिक पदाधिकारी सुमेन विश्वास, सुकंठ रॉय, पलाश घरामी, विनोद किरमे, राजू सातपुते, रमेश लेकलवार, संदीप भोवरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Don`t copy text!