वरूर रोड येथील वाचनालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; नवदांपत्याला बुद्ध प्रतिमा व संविधानाची भेट
प्रतिनिधी विशाल शेंडे

राजुरा: तालुक्यातील वरूर रोड येथील मेघा करमणकर आणि पांढरकवडा तालुक्यातील अमृत वानखेडे यांनी नुकतीच राजुरा येथील सम्राट हॉलमध्ये विवाहबद्ध होत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी दोन्ही परिवारातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाहाचे विशेष आकर्षण म्हणजे वरूर रोड येथील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाच्या युवक व विद्यार्थ्यांनी लावलेली उपस्थिती होती. केवळ हजेरी न लावता या तरुणांनी सामाजिक भान जपत एक नवा आदर्श समोर ठेवला. विवाहानंतर या युवक-युवतींनी नवदांपत्याला जगाला शांती, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीतून त्यांनी समाजाला एक सकारात्मक संदेश दिला.यावेळी स्वप्नील जीवतोडे, श्रुती बोरकर, विशाल शेंडे, समीक्षा मोडक, प्रज्वल बोरकर, समीक्षा जिवतोडे, सुजल जंपलवार, सागर बोरकर यांसह अनेक युवक-युवती उपस्थित होते.







