करंजी औद्योगिक क्षेत्रावरून संघर्ष तीव्र; जनसुनावणीशिवाय अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध
जिल्हा संपादक प्रशांत बिट्टूरवार
आक्सापुर (ता. गोंडपिपरी):
करंजी एमआयडीसी परिसरात प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, जनसुनावणी घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत अधिग्रहण करू नये, असा ठाम इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या औद्योगिक विभागाच्या वतीने तसेच तालुका काँग्रेस औद्योगिक विभाग गोंडपिपरीच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी दि. २२ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने करंजी एमआयडीसी परिसरातील १२ गावांमध्ये औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी JSW स्टील कंपनीशी करार केला आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, सिरसी देऊळवार, बोरगाव, धानापूर, लिखितवाडा, खराळपेठ आदी गावांतील हजारो हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहित होण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासन किंवा कंपनीकडून प्रकल्पासंदर्भात स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, सुमारे २२-२३ वर्षांपूर्वीही या परिसरात जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यावेळी योग्य मोबदला व नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अनेकांना आजपर्यंत त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शासन व कंपन्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पांचे उदाहरण देत, तेथेही शेतकऱ्यांची दिशाभूल करून कमी दरात जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे करंजी परिसरातील शेतकरी आता अधिक सतर्क झाले असून, योग्य मोबदला व नोकरीची हमी मिळाल्याशिवाय जमीन देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
अधिग्रहणापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी
शेतकऱ्यांच्या हरकती व आक्षेपांची गंभीर दखल घ्यावी
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर कमलेश निमगडे (जिल्हा उपाध्यक्ष, औद्योगिक विभाग काँग्रेस, चंद्रपूर) यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले. तसेच प्रतिलिपी माजी मंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आली आहे.
या वेळी दर्शना दुर्गे, मुन्ना तावाडे, योगेश कोरवते, मनोज मोहुर्ले, रामदास पेंदोर, दिलीप वासेकर, पंकज कोरडे, स्वप्निल निमगडे, इमरान शेख, अक्षय मेश्राम, चेतन मांदाडे, सुजीत मांदाडे, अमित दुर्गे, कपिल नैताम, ईश्वर झाडे, रामराव पेंदोर, अतुल झाडे, प्रवीण फुलझले आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, वाढत्या विरोधामुळे करंजी औद्योगिक क्षेत्र प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








