सकाळी वडील वारले, संध्याकाळी आईचं निधन, तासाभरात इंजिनिअर मुलाचाही मृत्यू, 13 तासात कुटुंब संपलं…

0
5762

सांगली : कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली असताना, इकडे सांगली हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 13 तासात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सांगली  जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी येथील झिमुर कुटुंबीयांवर कोरोनाने घाला घातला. अवघ्या 13 तासात सगळं कुटुंब कोरोनाने हिरावलं. 

पहाटे 5 वाजता वडील, तर संध्याकाळी 5 वाजता आई आणि त्यानंतर सहा वाजता मुलगा असे 13 तासात कुटुंब उध्वस्त झाले आहे.

तर आठ दिवसांपूर्वी चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आई, वडील, मुलगा आणि पुतण्या असा चौघांचा मृत्यू झाल्याने शिरशी गावासह पंचक्रोशी सैरभैर झाली आहे.

झिमुर गाव शोकसागरात

शिराळा हा डोंगरी आणि दुर्गम तालुका. हा तालुकाअति पावसाचा तालुका म्हणूनही ओळखला जातो .या तालुक्यातील बहुतांशी लोक हे नोकरीनिमित्त मुंबईला असतात. शिराळा उत्तर भागातल्या शिरशी गावातील झिमुर कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मुंबईला होते. ज्यांचा मृत्यू झाला ते वडील मिल कामगार होते. सेवानिवृत्त झाल्याने आपल्या पत्नीसह 15 वर्षा पूर्वी गावी आले होते. इथे येऊन ते शेती करू लागले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुली विवाहित आहेत. मुलगा मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले. त्याची पत्नीही पदवीधर आहे.

आई आजारी असल्याने मुलगा गावी

इंजिनिअर असणारा मुलगा पंधरा दिवसांपूर्वी गावी आला. त्यावेळी आई आजारी असल्याने गावीच थांबला. आईला कोरोनाचा संसर्ग झाला. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्याच्या वडिलांनाही कोरोणाची लागण झाली. त्या दोघांवर उपचार सुरू झाले. आई वडिलांची प्रकृती सुधारली होती. मात्र पुन्हा वडिलांची तब्बेत बिघडली. दरम्यान इंजिनिअर मुलालाही कोरोनाने गाठलं.

पहाटे वडिलांचं, संध्याकाळी आईचं निधन

एकामागोमाग एक असे तिघे कोरोनाबाधित झाले. उपचार सुरु असताना तरुणाच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते. सोमवारी सकाळी पाच वाजता पहाटे वडिलांचे निधन झाले. सकाळी झिमुर कुटुंबीयांनी त्यांचे अंत्यसंस्कार आटोपले. तोपर्यंत आई आणि मुलगा व्हेंटिलेटरवर होते.

सायंकाळी पाच वाजता आईचे निधन झाले. हा झिमुर कुटुंबीयांवर 12 तासात दुसरा आघात होता. ते दुःख समोर उभे असतानाच आईच्या निधनानंतर अवघ्या एका तासात मुलाचाही मृत्यू झाला. हा आघात मात्र झिमुर कुटुंबीयांना न पचणारा होता. नेमकं काय घडतंय हे अजूनही कुणाला समजत नाही.

झिमुर कुटुंब दुःखात बुडाले आहे. एकाच दिवशी इतके आघात झाल्याने शिरशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आठ दिवसांपूर्वी याच मुलाच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे आठ दिवसात झिमुर कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अख्खी पंचक्रोशी सैरभैर झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here