Home Breaking News गोंडपिपरीत MIDC विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार तीव्र हजारोंचा जनसागर; प्रशासनाविरोधात संताप उसळला…

गोंडपिपरीत MIDC विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार तीव्र हजारोंचा जनसागर; प्रशासनाविरोधात संताप उसळला…

140

गोंडपिपरीत MIDC विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार तीव्र
हजारोंचा जनसागर; प्रशासनाविरोधात संताप उसळला

प्रतिनिधी शरद कुकुडकर 
गोंडपिपरी :


गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित MIDC औद्योगिक क्षेत्राविरोधात गुरुवारी (दि. 23) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चक वडकुली, सिरसी देऊळवार, चक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा व खरारपेठ या 12 गावांतील हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका करत “शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देऊन उद्योगपतींचे हित जपले जात आहे” असा गंभीर आरोप केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जमीन हिरावून घेण्याचा कुठलाही डाव सहन केला जाणार नाही.”
प्रस्तावित प्रकल्पामुळे सुपीक शेती जमीन नष्ट होणार, जलस्रोतांवर प्रचंड ताण येणार, तसेच पर्यावरणीय प्रदूषण व मोठ्या प्रमाणावर विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी ठामपणे मांडले. याशिवाय, भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सामाजिक व पर्यावरणीय परिणाम अहवालात पारदर्शकतेचा अभाव असून, सार्वजनिक सुनावणी केवळ औपचारिकतेपुरती असल्याचा आरोपही करण्यात आला.
“आमची संमती न घेता जमीन घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा आमच्या मूलभूत हक्कांवर थेट आघात आहे,” असा संतप्त सूर आंदोलकांनी लावला. “मोबदला नको, पण जमीनही देणार नाही,” अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले.
गोंडपिपरी औद्योगिक संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. “जोपर्यंत MIDC प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल,” असा निर्धार समितीने व्यक्त केला. “आपली शेती, आपला हक्क” या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काळात रास्ता रोको, बंद व जिल्हास्तरीय आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी गोंडपिपरी तालुका औद्योगिक क्षेत्र संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी तसेच १२ गावांतील महिला, पुरुष, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर आंदोलनात समितीचे राजू झाडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या जमिनीवर कुणाचाही जबरदस्तीने हक्क चालणार नाही; ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे.” तसेच त्यांनी इशारा देताना म्हटले, “एकजूट ठेवून संघर्ष केल्यास कोणताही अन्याय रोखता येतो, त्यामुळे शेवटपर्यंत लढा सुरूच राहील.”
यावेळी संजय वडसकर म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही प्रकल्प आम्ही कदापि मान्य करणार नाही.”
तसेच सुरज माडूरवार यांनीही ठाम भूमिका मांडत सांगितले, “ही लढाई केवळ जमिनीची नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याची आहे.”
मंचावर समितीचे सदस्य कल्पेश खरबनकर, अमित भसारकर, योगेश कोरवते, अनुप कुंभारे, संतोष निकोडे, राजू सूरकर, रामराव पेंदोर, देवराव मडावी, प्रदीप खोब्रागडे, अजय माडुरवार, सुदर्शन कोवे, रामदास भषाखेत्री, भास्कर चौधरी, हरी मडावी, शंकर पाल, संदेश निमगडे, मुरलीधर लाटकर, निलेश तिवडे, प्रफुल आलम, मारोती जुवारे, तुळशीदास बारसागडे, आशुतोष भसारकर, सुनील मेश्राम, अंकित चूदरी, गजानन धंदरे आदींची उपस्थिती होती. तर तालुक्यातून शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Don`t copy text!