चंद्रपूर जिल्ह्यात मलेरिया-डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविली गेली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे 160 रुग्ण आढळले असल्याने उपाययोजनांची गती वाढविली गेली आहे.
दरम्यान मलेरियाने 21 दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील सिंदेवाही आणि नागभीड तालुक्यात हे मृत्यू नोंदले गेले आहेत. जिल्ह्यात जानेवारी 2021 पासून 274 मलेरिया रुग्ण आढळले आहेत.
विशेष म्हणजे ही वाढ ग्रामीण भागासह शहरी क्षेत्रातही चिंताजनक मानली जात आहे. मलेरियाचे 121 रुग्ण शहर मनपा क्षेत्रात आढळून आल्यावर शहर मनपाने दर शनिवारी ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे अभियान सुरू केले आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेविकांच्या माध्यमातून घराघरात पाण्याची भांडी कोरडी करण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. शहराच्या विविध भागात सघन फवारणी अभियानाच्या माध्यमातून डास निर्मूलन मोहीम वेगवान करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सांगितले.